"Dream, Dream, Dream! Conduct these dreams into thoughts, and then transform them into action."
- Dr. A. P. J. Abdul Kalam
4 Mar 2017
सभोवतालच्या कोळसाखाणी,सिमेंट फॅक्टरी,चोवीसतास सतत चालणारी कोळसा व सिमेंटची वाहतूकीमुळे अतिशय प्रदुषित, चंद्रपुरपासून २७ कि.मी अंतरावर असलेल्या घुग्घुस गावात प्रियदर्शिनी कन्या विघ्यालय व महविघ्यालय पर्यावरण संरक्षणाचा वसा घेवून ताठ मानेने उभी आहे. पुर्णपणे बालिकांची ही शाळा पर्यावरण स्नेही म्हणून प्रसिद्ध आहे.
ही एक अशी शाळा जेथे बालिकेच्या प्रवेशाचेवेळी तिचे रोपटे देउन स्वागत केले जाते व त्या रोपट्यास वाढविण्याची/संरक्षणाची जबाबदारी ती स्वखुशीने स्विकारते.एक अशी शाळा जी पक्षी,वन्यजीव, पर्यावरण संरक्षणाचे धडे विविध उपक्रमांच्या माध्यमातून देते.प्रवेशाद्वारावर पाय ठेवताच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ओव्या आपसूक ओठांवर यावीत असा परीसर. ही शाळा आपल्या परीसरात हिरवळ वाढवते व जैवविविधता जोपासते. हे सगळे शक्य झाले ते शाळेच्या मुख्याध्यापिका; पक्षी,वन्यजीव, वृक्षवल्ली व पर्यावरण यात विशेष आवड असलेल्या बहुआयामी स्मिताताई कोकोडे ठाकरे व त्यांच्या उत्साही शिक्षकांमुळेच.
वर्तमानपत्रात माझ्या शाळेच्या झळकलेल्या एका बातमीला वाचून त्यां माझ्या संपर्कात आल्या. माझ्या शाळेतील विविध पर्यावरण स्नेही उपक्रम समजून घेण्यासाठी त्यां स्वत: आपल्या शिक्षकांना घेवून आल्या. शाळेतील प्लॅस्टिक बॉटल्सचे कुंपण व त्यात मोठी झालेली झाडे पाहून त्यां खूप खूष झाल्या. असाच उपक्रम स्वतःच्या शाळेत वेगळ्या प्रकारे राबविण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर व्हॉट्स अॅप तसेच फोनवरील चर्चेव्दारे आपापसात विविध शैक्षणिक उपक्रमांची देवाण घेवाण करायचो.
व्हॉट्स अॅप, फेसबुक,टि्वटर या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मी चालविलेल्या प्लॅस्टिक प्रदुषणाचे मानव, जलचर, वन्यजीव व पर्यावरणावर होणारे परीणामया विषयावरील चळवळीची स्मिताताईंना माहीती झाली.तेव्हा त्यांच्याही शाळेत माझे व्याख्यान आयोजित करण्याची मागणी त्यांनी आवर्जून धरली.दिवसांमागून दिवस निघत गेले, पण कार्यक्रम व माझ्याकडील वेळेचा ताळमेळ काही जुळेना. शेवटी तो दिवस उजाडला.
मी प्रियदर्शिनी कन्या महाविघ्यालयात पाय ठेवताक्षणी,काही बालिका गटागटात हिरव्यागार झाडाखाली तर काही मोकळ्या आकाशाखाली बसून,दिलखुलास गप्पा गोष्टी करीत शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेताना दिसल्या. प्रवासाने अस्ताव्यस्त झालेले माझे केस पाहून कदाचीत काही मुली माझ्याकडे पाहून हसत होत्या. तेवढ्यात काही मुली माझ्याकडे आल्या आणि परीचय करून घेण्यासाठी डझनभर प्रश्नांचा भडीमार केला.एवढ्या बोलक्या मुलींशी बोलल्यावर माझे मनोबल वाढले.स्मिताताईंनी सांगितल्याप्रमाने मुलींना पर्यावरणाविषयी असलेली आवड व समज त्यांच्याशी घडलेल्या संवादातून लक्षात येत होतं.त्यामुळे या मुली पर्यावरणाचे संरक्षण तसेच प्लॅस्टिक प्रदुषण रोखण्यासाठी दुत म्हणून स्वयंप्रेरणेने काम करतील असा दाट आशावाद माझ्या मनात घट्ट होत होता.
मुलींशी संवाद साधताना मला पाहुन ताईंनी आपल्या शिक्षकांच्या चमुसह माझे स्वागत केले.ऑफिसमधे बसवले,चहापान व प्रवासातली माझी खैरखबर विचारत व्याख्यानाच्या विषयाबाबत अनौपचारिक चर्चा सूरू झाली. प्लॅस्टिक प्रदुषण ही महाभयानक समस्या असून, विजय तु आमच्या मुलींना एवढे जागृत कर की, घरीदारी प्लॅस्टिक प्रदुषणमुक्तीचा झंझावात त्यांनी सुरू करावा,स्मिताताई म्हणाल्या.
कार्यक्रमाची सुरूवात अगदी पारंपारीक रीतीने; पाहुण्याचा परीचय, स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचे मार्गदर्शन याप्रकारे झाले. व्याख्यान दर्जेदार होण्यासाठी लॅपटॉप, प्रोजेक्टर, स्पिकर, माईक व इतर बाबींची व्यवस्था केलेली.सभागृह खचाखच भरलेलं.
एक गमतीदार खेळ घेत उपस्थितांना व्याख्यानासाठी तयार केले. त्यामुळे मुली अगदी सहजतेने व्यक्त होत होत्या. तुम्ही प्लॅस्टिकच्या कोणत्या वस्तु वापरता? हा प्रश्न संपण्यापूर्वीच मुलींची शेकडो उत्तरं तयार. काय तो उत्साह! त्यांच उत्तर मी ऐकावं यासाठी मुलींची चाललेली धडपड. मात्र प्लॅस्टिक बनते कशापासून? या प्रश्नाने वातावरण अगदी शांत. कुणाकडेही उत्तर नव्हतं.तेव्हा एका व्हिडीओ क्लिपद्वारे त्यांना समजावले.नंतर हळूहळू प्लॅस्टिकचे विविध प्रकार,प्लॅस्टिक प्रदुषणाचा मानवावर,जलचरांवर,वन्यजीवनावर तसेच संपुर्ण पर्यावरणावर काय परीणाम होत आहेत हे विविध फोटो आणि चित्रफितींच्या मदतीने समजावले.
प्रस्तुतीकरणादरम्यान केलेल्या विविध शंकांचे समाधान करताना मला फार आनंद येत होता.
मर्गदर्शनादरम्यान खालिलप्रमाणे एकमताने आम्ही निर्णय घेतले.
१.प्लॅस्टिक प्रदुषणाबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाटय़ बसविणे.
२.आपल्या घरातील कचरा ओला,सुका आणि प्लॅस्टिक अशाप्रकारे वेगळा करण्याची घरोघरी सवय लावणे.
३.आपल्या परिसरातील प्लॅस्टिक कचरा शाळेत जमा करणे.
४.बाजारात फळे किंवा भाजीपाला खरेदी करताना प्लॅस्टिक पिशविला नकार देणे.
५.स्त्रियांना वाणात इतरांना कापडी पिशव्या देणे, असे व ईतर उपक्रम आयोजित करण्यास प्रोत्साहन देणे.
शेवटी विद्यार्थीनींना आपल्या जिवनात प्लॅस्टिकचा कमीतकमी वापर करण्याची शपथ देण्यात आली.
मला व्याख्यानानिमित्ताने या शाळेत आलेले अनुभव आपल्यापुढे मांडताना फारच आनंद होतोय.